
Contents
ब्रेकिंग न्युज : रांजणगाव गणपती येथील राजमुद्रा चौकात कंटेनर दुकानांमधे घुसला !(पहा व्हिडिओसह)
ब्रेकिंग न्युज : पहाटे पहाटे कंटेनरचा अपघात ; रांजणगाव गणपती येथील घटना !
शिरुर,दि.13 जुन : (अनिल डांगे यांच्या कडून)
ब्रेकिंग न्युज ठरणारी घटना रांजणगाव गणपती येथे घडली आहे.
रांजणगाव (राजमुद्रा चौक) शिरूर,ता.शिरुर,जिल्हा-पुणे येथे दि-१३/०६/२०२४ रोजी सकाळी ६ वा. ओम लॉजीस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीचा (कटेंनर) ट्रक तीन दुकानांत शिरला.मात्र अपघातात कोणतेही जीवित हानी झाली नाही.
लांब पल्याच्या वाहन चालकांची स्थिती…
पण काही बाबींवर चर्चा करणे महत्वाचे आहे. लांब पल्याच्या चालकांना पुष्कळ वेळा रात्र रात्र वाहन चालवावी लागतात. ते या गोष्टीचे व्यवस्थापन कसे करतात हे माहित नाही. पण हे काम सोपे नाही.फारच हार्ड काम म्हणावे लागेल ! ही बाजुही विचारात घ्यावी लागेल. त्यांचे ,’शास्रिय’ वाहन चालनाचे प्रशिक्षण होते की नाही हे ही समजायला मार्ग नाही. पण हे चालक तसे कसबी, कुशल आणि अनुभवी असतात, हे नक्की. तसे अपघात होत नाही, तोपर्यंत सर्व वाहन चालक हे ,’टायगर’ असतातच ! असे त्यांच्या बोलण्यातुन नेहमी दिसते. आणि ते खरेही आहे.त्यांच्या कामाचे स्वरुपात पाहता हे मान्य करावे लागेल ! अशा परिस्थितीत चालकाकडून चुक वगैरे होत असते. तो मुद्दाम म्हणून काही अशी जीवघेणी कसरत करणार नाही.
वाहन चालक कामगार वर्गांतीलच….पण शोषण !
मात्र यात एका विशिष्ट कामगार वर्गाचे शोषण होत आहे. त्याच्या श्रमाचा त्याला काय मोबदला मिळतो? एक तर हे खाजगी क्षेत्रामधील कष्टकरी आहेत.असंघटित कामगार आहेत.देशात असंघटित कामगारांसाठी कायदे आहेत.त्यांना मुलभूत अधिकार मिळतात का ? इतर सुविधा उदाहरणार्थ आरोग्य विमा मिळतो का? त्यांचा मालक त्यांना कोणत्या सुरक्षा हमी देतो ? काही, कोणत्या नोंदी ठेवतो का? संबंधीत विभागाला काही माहिती देतो का? संबंधित विभाग अशी माहिती ठेवतो का? की सर्व रामभरोसे चालते?
या घटनेमधे वेळ पहाटेची ! ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला असावा किंवा तो नशेत वगैरे असावा की नाही हे अद्याप समजले नाही. या वर्गामधे दारु पिण्याचे प्रमाण जास्त आहे हे खरे आहे. दारु पिणे ही एक वाईट गोष्टी आहे.वाहन चालवताना तर फारच घातक ! वाहन चालकासाठी आणि प्रवाशांसाठीही ! कारण नशेत तो चुक करु शकतो.पण सलग इतके तास वाहन चालवणे ही गोष्ट, ‘आम्हाला थोडी तरी टाकावीच लागते.डोळे लाल होतात.सतत रस्त्यावर,मागून येणार्या व पुढुन येणार्या वाहनांच्याकडे लक्ष ठेवावे लागते. अगदी डोळ्यात तेल घालून !जरा नजर चुकली तर ?….’ असे एक चालक सांगतो. असे असेल तर त्याचे हे श्रम आणि त्रास यांचा कधीतरी,कोणीतरी विचार करावा लागेल की नाही? प्रत्येक कामात स्ट्रेस आहे.पण तो कमीजास्त आहे की नाही?
बुर्झ्वा कोण ? मालक आणि सरकार !
पण काही क्षेत्रामध्ये कामगारांच्या हिताच्या गोष्टी केलेल्या असतात.पण वाहन चालक ,’ नशेबाजच’ असतात’ असे समाज मानतो. नशा करूनच तो गाडी चालवत असणार ! नाही तर अपघात होईलच कसा? असे लोक म्हणतात. वाहन चालकाला मुलगी सहजासहजी कुणी देत नाहीत. म्हणजे पत्नी म्हणून ! हे वास्तव आहे की नाही ? मग या कामगार वर्गाचे जीवन कसे आहे ? याकडे व्यवस्था लक्ष देत नाही. साहजिकच हा एक वंचित श्रमिकांचा वर्ग ठरतो. शोषित वर्ग ठरतो. मग यात बुर्झ्वा कोण ? मालक आणि सरकार !
म्हणून हे लिहीण्याची इच्छा झाली. मीही एक रिक्षा चालक आहे. म्हणून मी अनुभवाने सांगतो. तळमळतो आहे . सरकारने या क्षेत्रामध्ये विशेष लक्ष घातले पाहीजे. इंजिनियर, वैज्ञानिकांनी जास्तीत जास्त सुखकर वाहन चालन होईल,असे संशोधन का करु नये ? अपघात वा मृत्यु होणारच नाही, असे तंत्रज्ञान का शोधून काढू नये? मंगळावर आपण यान पाठवतो.किती गुंतागुंतीचे तंत्रज्ञान ! मग जिथे चालक व प्रवाशी यांच्या जिवीताच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, तिथे संशोधनाला प्रोत्साहन,शिष्यवृत्ती का देवू नये?असे विचार एक वाहन चालक म्हणून मनात येतात,म्हणून लिहिण्याचे धाडस करत आहे.काही चुकले तर माफी मागतो !
कारेगावचा यश इन चौक…..
आता या रांजणगाव गणपती एम आय डी सी पंचतारांकित भागात कायमच रहदारीचा आणि गर्दीचे विक्रम दिवसेंदिवस मोडीत निघत आहे. या वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक विभागावरही कायम तान असतो. कारेगाव, रांजणगाव एमआयडीसी, या परिसरातील मुख्यतः यश इन हॉटेल चौक,राजमुद्रा चौक, रांजणगाव गणपती गावातील मुख्य रोडवरील चौक,मंदिरासमोरील चौक या भागात कायमच ट्रॅफिक जॅम च्या समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागत.अपघातांची संभाव्यता जास्त असते.हे वारंवार घडत आहे.
यातच आज नशीब बलवत्तर म्हणून सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास कंटेनर वजा ट्रक राजमुद्रा या मुख्य चौकात सुसाट वेगाने ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने (?) राजमुद्रा चौकातील सदानंद हॉटेल, शेजारील एटीएम, किराणामाल दुकान ,सेफ्टी शूज चे दुकान या तिन्ही दुकानांचा व समोरील मोटरसायकलचा चुराडा करत अखेर थांबला..!!
जिवीत हानी नाही…..
सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दुकाने बंद असल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. ट्रक ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झाली आहे. रांजणगाव एमआयडीसी परिसरातील रहदारीने कायमच गजबजलेल्या राजमुद्रा चौकात आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अशा अपघातात दुकानांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. मात्र कोणतीही जीवित हानी झाली नाही. हेच आजच्या या अपघातातील सुदैव म्हणावे लागेल !