Atmakathan – मीच ती बोलतेय… – रांजणगाव हत्याकांडातील दलित महिला !
Atmakathan : रांजणगाव गणपती एमआयडीसी येथे घडलेल्या दलित महिलेच्या हत्याकांडावर आधारित आत्मकथनात्मक शैलीतील लेख दिला आहे. हा लेख "मीच ती बोलतेय..." अशा शैलीत असून, तो वाचकाला हादरवतो, विचार करायला लावतो आणि सामाजिक प्रश्न उभे करतो. यामध्ये आत्मकथन, सामाजिक विद्रूपतेचं भान, आणि न्यायव्यवस्थेवरील प्रश्न यांचा समावेश आहे.
Atmakathan – मीच ती बोलतेय… – रांजणगाव हत्याकांडातील दलित महिला !
Atmakathan – Mi Tich Boltey !
“हो, मीच ती. माझं नाव आतातरी कागदावर आहे—’मृत’ असे ! किती वेदनादायी ! पण माझी कथा अजूनही जिवंत आहे.”
ती एक साधीशी सकाळ होती. अंगण झाडून झालं होतं माझं . लेकरू शाळेला निघालं होतं. नवऱ्याच्या डब्यात भाकरी घालून मी मळ्यात येण्यासाठी पिशवी उचलली देखील होती. मला कोणालाही त्रास न देता जगायचं होतं. पण काय गुन्हा होता माझा ? मी दलित होते म्हणुन? गरीब होते म्हणुन? कष्टकरी होते… की फक्त “होते” म्हणुन ?
रांजणगाव एमआयडीसीमध्ये मी काम करत होते. शेकडो लोकांत माझं अस्तित्व म्हणजे नुसतं एक “हजेरी लावणं फक्त “
पण माझ्या अंगात श्रम होते.कष्टाची ताकत होती. माझ्या डोळ्यांत स्वप्नंही होती. माझ्या काळ्या सावल्यांत आता शहाणपण पण आलं होतं.
पण काहींच्या मते, माझ्या स्वप्नांच्या पाखरांना उडण्याचा अधिकार नव्हता.
👣 तसं काहीच विशेष असं नव्हतं त्या दिवशी…पण
आठवतंय मला ते सगळं…
त्या दिवशी सुरुवात झाली होती कर्जावरच्या दमदाटीने. मग बॉसच्या ओरड्यांनी.पण हे करत होते मात्र वेगळ्याच उद्देशाने, नजरेने,पुर्वग्रहांचे चष्मे घातलेले आणि त्यानंतर… त्या पुरूषाच्या खुनशी नजरेने.
त्याची वैरी नजर माझ्या कपड्यांतून आरपार बघत होती. मी बाजूला होऊन गेले. पण त्याला माझं मौन, माझा संकोच आवडला नव्हता !
“बाई,लई माज दाखवतेस का?” त्याने हसून विचारलं.
त्या दिवशी त्याने मला गाठलंच होतं . निर्लज्जपणे, निर्घृणपणे. माझ्या आरडाओरडीनं गोदाम हादरलं होतं , पण तोंडाला रूमाल होता.
मी फडफडले… मी झुंजले…मी जीव वाचवण्याचा शेवटचा प्रयत्नही केला.
🩸 मी मेली नाही… मारली गेले!
मी आत्महत्या नाही केली ,
मी क्षणात वाऱ्याशी विरघळणारी नाही.
मी हळूहळू गुदमरले, ओरडले, आणि छळले गेले.
माझ्या त्या शरीरावरचे जखमेचे ठसे न्याय मागतील का? आता माझे शरीर जिवंत नाही.डोळे जिवंत नाहीत,किमान खुणा करुन तरी काही सांगु शकतील.माझी जीभ जिवंत नाही की सगळे काही धडाधड सांगेल पोलिसांना !
माझे हात ,पाय नाहीत जिवंत की दाखवतील पुराव्याच्या जागा ! की लिहुन देतील सारी कथा ! पण मी पुरावे सोडुन गेले आहे. शोधा,आणखीन शोधा,पुन्हा शोधा ! नक्कीच तो नराधम सापडेल !
माझ्या हातात असलेली सुरकुतलेली बांगडी ओरडेल का आता , “ती बळी होती”? असे सांगितल्यासाठी?
की पोलिस फाईलमध्ये ‘प्रकरण फक्त तपासाधीन आहे’ ! एवढंच आहे का माझं भविष्य?नाही !
❓मी ‘दलित’ म्हणून जन्म घेतला म्हणजे काय झालं ?दुनिया बुडाली का?
मी विचारते—
“दलित” म्हणजे काय फक्त आरक्षणासाठीची ओळख आहे ?
की माझ्या रक्तालाही काही किंमत आहे?
जन्माने ‘अस्पृश्य’ समजणार्यांपेक्षा मनाने मी पवित्र होते…जगस्पर्षी होते, तरी समाजाने मला धूळ का समजले?
जेव्हा माझ्या नावावर बातमी आली ,
तेव्हा काहीजणांनी लिहिलं होतं – “एका दलित महिलेचा खून.”
कोणी विचारलं की – “का?”
कोणी म्हणालं – “बरं झालं, कमी झाली एक…”काय फरक पडतोय ?
🪔 पण माझ्या मृत्यूला जागं ठेवा…
माझ्या मुलांनी अजून आई म्हणून हाक मारलेली नाही.
माझ्या नवऱ्याने अजून माझा पदर उगाळलेला आहे.
पण सरकारचं ‘उत्तर’ काय? तर ‘मदत मिळेल’, ‘तपास सुरू आहे’.अरे कसली मदत देतोस? स्वाभिमान सोडुन जास्त काय आहे महाग? तो मी जपला जितेपणी !
माझ्या हत्येवरचे पुरावे झाकण्याचे प्रयत्न केले जात आहेत का?
जातीय छळ आणि लैंगिक हिंसाचार यांचं हे मिश्रण नाही काय ? एकसमयावच्छेदक !
फक्त माझ्यावरच नाही, हजारो दलित महिलांवर होतोय अत्याचार! आजची बातमी वाचा ! सरकारी आकडेवारी आहे.
🙏 शेवटी एवढंच म्हणेन…
माझं नाव विसरू नका रे…
‘प्रतीक’ बनवून लढा ते शेकडोंना न्याय मिळवून देण्यासाखी ! नव्हे तर अशी व्यवस्थाच मोडण्यासाठी…
माझी वेदना मनात जागी ठेवा.
मी ‘वैष्णवी’ नाही, पण मीही ‘जळले’.
मी ‘मणिपूर’ नाही, पण माझ्या शरीरावरही ‘वार’ झाले.
मी ‘निर्भया’ नाही, पण माझा आवाज दाबण्यात आलाय.
मी तुमच्यातलीच होते ना !
पण तुम्ही बोलला असता , तर कदाचित मी जगले असते.
——-
🔎 संपादकीय टिप:
ही कथा काल्पनिक वाटू शकते, पण ती वास्तवाच्या आधारे आहे.कल्पना व वास्तव घटना यावर आधारित आहे.
या हत्याकांडाची चौकशी पूर्ण पारदर्शक होईपर्यंत समाजानं आवाज उठवणं थांबवू नये.
‘सत्यशोधक न्युज’ या व्यासपीठावर आम्ही ही ‘कहाणी’ न्यायासाठी मांडतो आहोत.
—
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com