शिरूर नगरपरिषद निवडणूक 2025 : मतमोजणीच्या दिवशी नगरपरिषदेसमोरील मुख्य रस्ता बंद
— शिरूर पोलिसांची नागरिकांना सूचना
शिरूर, दिनांक 20 डिसेंबर 2025| प्रतिनिधी|
शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने मतमोजणीच्या दिवशी नगरपरिषद कार्यालयासमोरील मुख्य रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडील आदेशानुसार दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 जाहीर झाली होती. त्या अनुषंगाने 12 डिसेंबर 2025 रोजी शिरूर नगरपरिषदेचे मतदान पार पडले होते. आता या निवडणुकीची मतमोजणी दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी शिरूर नगरपरिषद कार्यालयाच्या तळमजल्यावर होणार आहे.
मतमोजणीच्या दिवशी नगरपरिषदेसमोरील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने, नागरिकांची सुरक्षितता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नगरपरिषद गेटसमोरील मुख्य रस्ता सार्वजनिक रहदारीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच, सर्टिफाइड स्कूलजवळील पुणे–नगर रस्ता तसेच माजी वसुंधरा मार्ग या परिसरात आवश्यक तो पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याबाबतची अधिकृत सूचना पोलीस निरीक्षक संदेश देशमुख केंजळे यांनी शनिवार, दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी दिली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
