
बसमध्ये गर्दीचा फायदा घेत ४ लाख ६८ हजारांचे दागिने लंपास !
शिरूर | प्रतिनिधी- (Satyashod News Report )
शिरूर एस.टी. बस स्थानकावर एका महिलेचे ४ लाख ६८ हजार ८०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. 314/2025 अंतर्गत BNS कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सौ. रूपाली अनिल काळेल (वय ४८ वर्ष, व्यवसाय – गृहिणी, रा. त्रिमूर्ती नगर, भिगवणरोड जळोची, बारामती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 11 मे 2025 रोजी दुपारी 12:00 वाजता, त्या त्यांच्या मुलगी तन्त्री आणि भाची साक्षीसह बारामतीला जाण्यासाठी शिरूर बस स्थानकावर आल्या होत्या. त्यावेळी न्हायरा केडगाव चौफुला एस.टी. बस (क्र. MH 14 BT 4193) मध्ये बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांचे 6.5 तोळ्यांचे सोन्याचे गंठण आणि 13 ग्रॅम सोन्याचे झुबे, एकूण 4,68,800 रुपयांचे दागिने चोरून नेले.
या प्रकरणी पो.हवा/1191 आगलावे यांनी गुन्हा दाखल केला असून, पो.हवा. जगताप हे तपास करत आहेत.
शिरूर परिसरात गर्दीच्या ठिकाणी वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.