“मंचरमध्ये सुविधा आहेत… मग शिरूर उपजिल्हा रुग्णालय का नाही? फक्त ग्रामीण दर्जा अद्याप का?”
Contents
शिरूर उपजिल्हा रुग्णालय कधी होणार?
31 मार्च 2026 |Editorial
शिरूर उपजिल्हा रुग्णालय हा विषय आता केवळ मागणी राहिलेला नाही, तर नागरिकांच्या जगण्याशी थेट जोडलेला प्रश्न बनला आहे. मंचरमध्ये वेळेवर उपचार मिळाल्यामुळे एका वृद्ध महिलेचे प्राण वाचले, पण शिरूरमध्ये अशी सुविधा नसल्यामुळे रुग्णांना ससूनपर्यंत धाव घ्यावी लागते.
ही वस्तुस्थिती लपवता येत नाही. मोठे शहर, वाढती लोकसंख्या आणि तरीही मूलभूत आरोग्य सुविधा अपुऱ्या, यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे आणि उपजिल्हा रुग्णालयाची गरज आता अधिक तीव्रपणे समोर येत आहे.
शिरूरच्या सत्ताधाऱ्यांनी उदाहरण घ्यावे अशी घटना मंचर सारख्या ठिकाणी घडलेली आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयात Thrombolysis उपचार पद्धती वापरून एका 70 वर्षीय गरीब महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.शिरूरमध्ये उपजिल्हा रुग्णालय झाल्यावर हे घडणार नाही का? मागणी किती दिवसांपासून आहेच ना?
शनिवार 28 रोजी ही घटना घडली. हृदयविकाराचा तीव्र झटका असताना वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्या महिलेला जीवदान मिळाले. ही गोष्ट साधी नाही, कारण अशा प्रकारच्या उपचार पद्धती पहिल्या काही तासांत मिळाल्या तरच जीव वाचण्याची शक्यता असते.
मंचर हे आधी तालुक्याचे ठिकाण देखील नव्हते. नगरपालिका अलीकडे आली. तरीही तेथील लोकप्रतिनिधींनी उपजिल्हा रुग्णालय उभे केले.समाजाने ते निर्माण केले. त्या रुग्णालयात आज परिसरातील गरीब लोक मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत.
खाजगी रुग्णालयातील खर्च परवडत नसताना सरकारी रुग्णालय त्यांच्या मदतीला उभे आहे. Thrombolysis ही उपचार पद्धती म्हणजे रक्तवाहिनीत तयार झालेली गुठळी औषधांच्या मदतीने विरघळवणे.त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि रुग्णाचे प्राण वाचतात.
मग प्रश्न सरळ आहे : “शिरूर उपजिल्हा रुग्णालय”हा मन्चर सारखा का बनवला जात नाही? शिरूर हे मोठे शहर, हायवेवर, परिसरात मोठी लोकसंख्या,एम आय डी सी,महान दानशूर (?) माणसं, सर्व तगडे पक्ष, तगडे धिप्पाड, मोठी भव्य दाढी, निषाने, रन्ग, किमान स्थानिक यु ट्यूब चेनल, साईटस फोटो, व्हिडीओ घ्यायला. प्रसिद्धी द्यायला आहेत.
टोलेजन्ग मिरवणुकासाठी पैसा, साधने, माणसे, कार्यकर्ते आहेत. सन्घटना एक से एक वाघ, टायगर, छावे, झाशी राणी स्टाईल महिला कार्यकर्या आहेत.
तरीही गरजू रुग्णांना पुण्याच्या ससून रुग्णालयाकडे पाठवले जाते.सरकारी ग्रामीण रुग्णालय आहे. बराच खर्च करुन बान्धकाम दिसते. तरी आनंदाने “इथे सुविधा नाहीत, ससूनला जा” हे सहज सांगितले जाते.चिठ्ठी दिली जाते.
मग इथे जे इमारती, यंत्रणा, डॉक्टर आहेत ते नेमके कशासाठी? त्यावर होणारा लोकांच्या करातुन जमा होणार्या पैशातुन होतो. हा कर भिकाऱ्याकडुन सुद्धा अप्रत्यक्षपणे वसुल होतो. सर्व लोकांना ही माहिती नसते. पण काही लोकांना असते.
शिरूरमध्ये खाजगी डॉक्टरांची मोठी व्यवस्था आहे. काही जण चांगले काम करतात. पण काहींचे वागणे डॉक्टरसारखे न वाटता लूटारुसारखे वाटते. कमी वेळात मोठी हॉस्पिटल्स उभी राहतात. वेगवेगळ्या गटांची, जातीची डॉक्टरांची लॉबी असावी,?
हा बौद्धिक धुर्तपणा की वैचारिक दिवाळखोरी म्हणावी? वैद्यकीय ज्ञानाचा किती वापर सेवेसाठी आणि किती पैसा कमावण्यासाठी होतो यावर प्रश्न उपस्थित होतो. सामान्य माणूस आधीच आर्थिक अडचणीत आहे, त्याला हे सगळे परवडत नाही.
दुसरीकडे शिरूरमध्ये मोठमोठे कार्यक्रम, जत्रा, उत्सव, मंडप, खर्च — कोट्यवधी रुपये सहज खर्च होतात. दोन-दोन महिने तयारी, लाखो लोकांची गर्दी. पण आरोग्य सुविधा उभ्या करण्यासाठी मात्र कुणी पुढाकार घेताना दिसत नाही. कारण यात बेकायदेशीर काळा पैसा वापरता येत नाही. हक्काचे राजकीय कार्यकर्ते मिळत नाहीत.
शिरूरमध्ये झोपडपट्ट्या वाढत आहेत,साधारण 9 अशी सन्ख्या आहे. गरीब लोकांची संख्या मोठी आहे, पण त्यांच्या आरोग्याच्या मूलभूत गरजा अजूनही अपुऱ्या आहेत. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कार्यकर्ते — सगळे आहेत,आमदार, खासदार आहेत,उद्योगपती आहेत.
दानशूर आहेत. पण शिरुर उपजिल्हा रुग्णालय मात्र काही होत नाही. मागण्या होतात, निवेदने दिली जातात, चर्चा होते, पण प्रत्यक्षात काही बदल दिसत नाही.तशी हौस असणारे, निवेदने देणारे, उपोषणास बसणारे, नन्तर उठणारे, त्यांची दखल घेऊन शेवटी एक पत्र कनिष्ठ पदावरील एखाद्या व्यक्तीला पाठवुन लिंबुपाणी वगैरे देऊन उपोषण सोडवणारे, सोडणारे भम्पक त्यागी शहर व तालुक्यात एकुण लोकसंख्येसाठी किती असावेत? तेवठे आहेत.
‘सत्यशोधक’च्या वतीने स्पष्ट मागणी आहे की शिरूरमध्ये उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू व्हावे. हे आंदोलनासाठी नाही. तर समाजाची गरज म्हणून सांगितले आहे.आम्ही उपोषण कधीच करणार नाही. आम्हाला भुक लागते.अतिरिक्त चरबी व उर्जा आमच्याकडे नाही. मोठी टीम नको. तिचा ‘इतर’ खर्च कुणी व कुठून करायचा?दोन नंबरचे धन्दे नेमके कसे करतात? सुरवात कशी व कोठुन करतात? हे आम्हाला कोणीतरी शिकवावे येऊन!
प्रत्येक वेळी लोकांनी पुण्याला धाव घेणे हा उपाय नाही. स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे.आणखीन थोड्या काळात ससुनप्रमाणे सर्वोपचार रुग्णालय देखील व्हावे. तुम्हाला माहित आहे का की जिवनाची सुरक्षितता मिळवणे हे एक भ्रष्टाचाचामागील महत्वाचे कारण असते. मरता क्या ना करता? हे सर्व जीवांना लागू आहे.
ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची ताकद आहे — त्यांनी आता स्वतःला प्रश्न विचारावा. समाजासाठी खरंच काही करायचं असेल तर अशा कामासाठी पुढे यावं. लोकांना विचार करायला शिकवणं,अन्धस्रद्धा न वाढवता आरोग्य सुविधा निर्माण करणं — हाच खरा विकास आहे.
मंचरमध्ये एका महिलेचे प्राण वाचले. शिरूरमध्येही ते शक्य आहे —”शिरूरमध्ये उपजिल्हा रुग्णालय”
फक्त इच्छाशक्ती लागते.
अधिक,’ सत्यशोधक’ बातम्या वाचा—-
Shirur illegal construction protest : अतिक्रमण बातमी, शिरुर
Shirur Crime News : शिरुर तालुक्यातील सर्व गुन्हेगारी प्रकरणे व पोलीस कारवाई
Breaking Shirur Crime: महाशिवपुराण कथेदरम्यान महिलेचा संशयास्पद मृत्यू — सत्य दडपले जात आहे का?
